Shri संत आवजीनाथ बाबा हे वंजारी समाजात गोरे घराण्यात जन्माला आलेले एक थोर संत होते. त्यांचा जन्म विरगाव, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र येथे झाला होता. लहानपणीच त्यांचे आई-वडील वारल्या मुळे त्यांच्या मिरपूर लोहारे, तालुका संगमनेर, जि अहमदनगर येथील रणमाळे मामांनी त्यांचे पालन पोषण केले.
प्रचलित अख्यायिके नुसार त्यांना तरुणपणीच संत कानिफनाथ महाराजांचा दृष्टांत आणि गुरूग्रह झाला. लवकरच आवजीनाथ बाबांनी मिरपूर लोहारे येथे नवरात्रीत संजीवन समाधी घेतली. बरोबर दसऱ्याच्या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली आणि तेव्हा पासून ते आजतागायत म्हणजे गेल्या ३५० वर्षांपासून मिरपूर लोहारे येथे आवजीनाथ महाराजांची दसऱ्याला जत्रा भरते. येथे विविध जाती धर्माचे भाविक मोठ्या उत्साहाने हजेरी लावतात. दरवर्षी रंगपंचमीला श्रीक्षेत्र मढी (कानिफनाथ महाराजांचे स्थान) येथील जत्रेत आवजीनाथ महाराजांच्या काठीचा मान असतो, त्याशिवाय जत्रा सुरू होत नाही.
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सुपे सावरगाव या गावात २९ जुलै १८९६ रोजी भगवान बाबांचा जन्म झाला. भगवान बाबांचं मूळ नाव आबाजी तुबाजी सानप. कौतिकाबाई आणि तुबाजीराव यांचे हे पाचवे अपत्य. शांत, निश्चयी असलेल्या आबाजींच्या घरात धार्मिक वातावरण होतं. त्यांचे कुटुंब नारायणगडाचे महंत माणिकबाबा यांचे उपासक होते. शेती करत भक्तीत लीन असलेल्या आबाजींना एकदा विठ्ठलदर्शन झाले. यानंतर त्यांनी संपूर्ण जीवन विठ्ठलचरणी अर्पण करण्याचे ठरविले. काही दिवसांनी आबाजींना घेऊन आईवडील विजयादशमीच्या दिवशी दर्शनानिमित्त नारायण गडावर आले. तेथे माणिकबाबांकडे आबाजींनी अनुग्रह द्या, असा हट्ट धरला. शिष्यत्वाच्या परीक्षेत आबाजीं उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना माणिकबाबांनी अनुग्रह दिला. तेव्हा माणिकबाबांनी त्यांचे नाव भगवान बाबा असे ठेवले.
पुढे माणिकबाबांनी भगवानबाबांवर नारायणगडाची जबाबदारी टाकून देह त्यागला. नारायण गडावर भगवानबाबांची समर्पित भावनेने सेवा करू होती. दरम्यान, गडावरील काही लोकांना मात्र त्यांच्यावर लोभी असल्याचा आरोप केला. यामुळे दुखावलेल्या भगवानबाबांनी नारायणगड सोडला. त्यानंतर भगवानबाबांनी धौम्यगड येथे वास्तव्य केले. येथे राहून भक्तीसोबतच त्यांनी परिसरातील ग्रामस्थांचे प्रबोधन केले. धौम्य ऋषींच्या पादुकांची सेवा करत त्यांनी धौम्यगडावर भक्तीचा गड उभारण्याचे काम सुरु केले. लोक सहभागातून श्रमदानाने धौम्यगड ते पायथ्याच्या खरवंडी गावाचा रस्ता आणि गडावरील बांधकाम केले. पुढे १९५८ मध्ये गडावरील देवळात विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
गडाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १ मे १९५८ रोजी करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी, भगवानबाबांनी भक्तांना एकत्र करून येथे विठ्ठल भक्तीचा गड उभारला आहे. आजपासून धौम्यगड हा भगवानगड म्हणून ओळखला जावा, असे आवाहन केले. तेव्हापासून धौम्यगडाचे नाव भगवानगड असे पडले. जीर्णोद्धारानंतर भगवानबाबांनी गडावर दसरा मेळाव्यास सुरुवात केली.
पांढरेशुभ्र धोतर, पांढरा सदरा, पांढरा फेटा अशी साधी राहणी असलेले भगवानबाबा अत्यंत शिस्तबद्ध होते. भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा समन्वय साधला होता. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ , तेलंगना, आंध्रप्रदेश, कर्नाटकातील काही भाग व पश्चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी कायम मानवतेचा पुरस्कार केला. समाजाच्या सेवेत असतानाचा १८ जानेवारी १९६५ रोजी रात्री एक वाजता वयाच्या ६९ व्या वर्षी भगवानबाबांचे देहावसान झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळला पसरली होती.
वंजारी समाज हा भारत, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, हरियाणा, पंजाब, जम्मू आणि काश्मीरमधील एक प्रमुख क्षत्रिय भटका समाज आहे.
भारतात, विविध राज्यांमधील सर्व समुदायांमध्ये मिसळणारा शेतकरी समुदाय दुर्लक्षित राहिला आहे. यामुळे, आज आरक्षणामुळे निर्माण होणारा समाज क्षत्रिय असूनही, इतर क्षत्रियांकडून आदर मिळवत नाही.
Copyright © 2025 Vanjari Connect. All rights reserved.